रात्रीचे नक्षत्रांचे दिवे विझून हळू हळू सुर्याबिम्बाच दर्शन व्हायला लागल होतं.. गोजिरवाणा रविकर त्याची किरणं केशर उधळल्यासारखी फैलावत होता..कळ्या - फुलांच्या गालांच चुंबन घेत आणि पाखरांना सुखद धक्का देत वसंत ऋतू आला होता..!! अंजिराच्या झाडावर बसून फळांवर चोचीने अलगद टिचक्या देत कोकिळेच कुजनही चाललं होतं..मनात 'कुहू कुहू बोले कोयलिया' हे गाणं घुटमळत होतं ..अंगणातली रंगीबेरंगी काठांचे हिरवे शालू नेसलेली झाडं मनाला मोहिनी घालत होती..माझ्या अंतरंगातल्या स्वप्नांवर लक्ष लक्ष साज चढवत होती..
सकाळचा प्रहर संपला..मध्यानही टळली.. संध्याराणीचा दरबार सजला.. दरबारींना आसनस्थित करून संध्याराणी शीतलतेने, मोहकतेने सिंव्हासनावर आरूढ झाली..विहंग घरट्यांच्या ओढीने लगबगीने परतत होती.. अचानक नभो मंडपात कृष्णावार्नियांनी हजेरी लावली..निमिषार्धात विजा गर्जू लागल्या . अगोदरच शृंगार पूर्ण असलेल्या संध्येचा , हिरे माणिक यांच्यासारख्या लखलख करणाऱ्या दामिनिंमुळे थाट वाढला.. ऋतुराज वसंत आपल्या सोबतीला शीतलतेचा, तृप्तीचा इंद्रधनुही घेऊन आला होता..
वसंत गरजत होता, बरसत होता , कणाकणातून बहरत होता..चिमण्या पाखरांचा किलबिलाट, चिवचिवाट थांबला, जलधारांनी न्हाऊन निघालेले पक्षी पंख मोकळे करण्यासाठी ऊबदार जागेचा आसरा शोधत होते..
रातदिव्यांच्या प्रकाशात तर जणू सोनेरी पाऊस पडत होता.. वसुंधरा..तिने स्वतःला शमवून घेतला या गारव्यात..मृण्मयी न्हाऊन निघाली ! त्या रूपात ती अगदी "बा. सी. मर्ढेकरांच्या" कवितेतल्या न्हालेल्या गर्भवतीसारखी दिसत होती..चातकानेही तृषा शमवली..वृक्षवेलींनीही जलधारांवर नाचून ऋतू राजाचं यथार्थ स्वागत केलं..सुमनांच्या गालांवर टिचक्या देत ऋतू राजानही ते स्वीकृत केलं..सृष्टीचा रंग आणि गंध यांच्या सप्तरंगात भर घालणारा हा सोहळा थांबला.. धरित्रीचा कण न कण तृप्त झाला..
माझ्या स्वप्न नक्षत्रांमध्ये असंख्य तारकांची उधळण करणारा हा अभूतपूर्व, ऋतू राजाच्या आगमनाचा सोहळा मी रेशमी लडीत अलगद गुंडाळून ठेवला आहे..!!